टिळक महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय परिषद   

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा समाजकार्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महिला अधिकार व सामाजिक न्यायासाठीचे एक युगपुरुष’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद २९ व ३० एप्रिलला होणार आहे.
 
मंगळवारी सकाळी ११ वाजता परिषदेचे उद्घाटन टिमवित होणार आहे. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचन करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रामदास अत्राम व बार्टीचे महासंचालक सुनील वारे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक असणार आहेत. समाजकार्य विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रकाश यादव प्रास्ताविक करणार आहेत.
 
कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या प्रा. सुनीता सावरकर, सुधा जोगदंड, मीराताई मस्के, केशरबाई घुमरे व उर्मिला रायमाने यांचा सन्मान करण्यात येणार आहे. परिषदेचे बीजभाषण जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रा. संघमित्रा आचार्य करतील.
 
पहिल्या दिवसाच्या पुढील सत्रात प्रा. सुनीता सावरकर महिला अधिकार व सबलीकरण यासंदर्भातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडतील. या सत्राचे अध्यक्षस्थानीही त्या असतील. याशिवाय, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. सुरेश बाबू व सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे प्रा. अजय चौधरी आपले विचार मांडणार आहेत.
 
पहिल्या दिवसाचा समारोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रा. श्रुती तांबे यांच्या अध्यक्षतेखालील सत्राने होईल. या सत्रात समकालीन परिस्थितीत महिला अधिकार व सामाजिक न्याय या विषयावर चर्चा केली जाईल. तसेच, प्रो. नागराजू (हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ) व प्रो. जगदीश सोळंकी (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा) हेही आपले विचार मांडतील.
 
दुसर्‍या दिवशी महिला अधिकार व सबलीकरण या विषयावर चर्चासत्र होईल. यावेळी अध्यक्षस्थानी जनवादी महिला संघटनेच्या डॉ. किरण मोघे व युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाचे निवृत्त सहसंचालक यशवंत मानखेडकर असतील. प्रतिभा वानखेडे, डॉ. प्रवीण घोडेस्वार व डॉ. स्नेहा गायकवाड चर्चेत सहभागी होतील.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोनातून सामाजिक न्याय : काल, आज आणि उद्या या विषयावर चर्चासत्र होईल. या सत्राच्या अध्यक्षस्थानी मासूम सामाजिक संस्थेच्या डॉ. मनीषा गुप्ते  व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी असतील. या सत्राम डॉ. बळीराम गायकवाड, विधिज्ञ रंजना भोसले व डॉ. शरद गायकवाड सहभागी होणार आहेत. परिषदेत शोधनिबंध सादरीकरणाचे सत्र होणार आहे. ज्यात देशभरातील विविध विद्यापीठांमधून आलेल्या ६० संशोधकांनी शोधनिबंध सादर केले आहेत. या सत्राचे अध्यक्ष डॉ. सुधीर मस्के, डॉ. वीरभद्रम, डॉ. धनंजय लोखंडे, डॉ. कीर्तिराज दादाराव, डॉ. अनिता मोहिते आणि डॉ. संदीप जगदाळे असतील.
 
दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप सत्रात ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ज. वि.पवार प्रमुख पाहुणे म्हणून, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. विजय खरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारोप सत्रात डॉ. प्रकाश यादव परिषदेचा आढावा घेतील. 
 

Related Articles